रिम झिम गिरे सावन …

“रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन”

रेडिओवर किशोर चिंब करत गात होता. तसं पाहायला गेलं तर गाण्यात अपेक्षित असलेली ‘अगन’ लागण्याची (आणि लागलीच तरी दाखवण्याची) आता फारशी संधी उरलेली नाहीये. पण हा पावसाळा तसा कोरडाच गेलेला होता. सद्ध्या ट्रेक्स तर पूर्णपणे बंदच झालेले आहेत. या वर्षी फारसे कुठे आऊटींगलाही जाणे झालेले नव्हते. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर कुठेतरी उंडगायला जावून पावसात मनसोक्त भिजायची ‘अगन’ मात्र मनात लागलेली होती. नुकताच आजारातून उठलेलो असल्यामुळे बाहेर कुठे जायला मिळेल याची शक्यता नव्हती. सौभाग्यवतींनी लगेच डोळे वटारले असते. त्यामुळे भर पावसाळ्यात उष्ण  ‘सुस्कारे’ सोडत पडलो होतो. तितक्यात फोन वाजला. सौ.नीच उचलला…

‘ओंकार’ आहे, उपांड्याला जायचेका म्हणून विचारतोय? हा उपांड्या काय प्रकार आहे?

अगं घाट आहे उपांड्या, मढेघाटाच्या जवळ.

जाणार आहेस तू?

इच्छा तर आहे, पण….

ओंकार आहे बरोबर तेव्हा काही हरकत नाही. ( ओंकार पंचवाघ हा माझा एक नात्याने भाच्चा-पुतण्या आहे पण वृत्तीने जिवलग मित्र आहे) कुलकर्णीबाईंचा नवर्‍यावर नसेल पण भाच्यावर मात्र २००%विश्वास, अर्थात हा माझ्यापेक्षा फार काही लहान नाहीये वयाने. फार फार ८-९ वर्षे 😉 ).
पण जर्कीन घालून जाणार असशील आणि फार  भिजणार नसशील तर जा. माझ्या जिवाला अजून घोर नको लावू.

मी टुण्णकन उडी मारली. तिच्याकडून फोन घेतला…

“श्रीमंत, लौकर या, वाट पाहतोय.”

तरीही चिंचवडवरून कात्रजला आमच्या घरी पोहोचेपर्यंत श्रीमंतांना साडे दहा वाजले आणि आल्यावर मग नाष्टा करुन निघेपर्यंत अकरा-सव्वा अकरा झाले होते. बाईकला किक मारली आणि सुसाट निघालो. सिंहगडाला उजव्या बाजूने अर्ध प्रदक्षिणा घालत पाबे घाटात प्रवेश केला..

प्रचि १ : पाबे घाटात प्रवेश करताना…

पाबे घाटात प्रवेश केला आणि इतका वेळ टॉपवर असलेली बाईक आपोआप पहिल्या-दुसर्‍या गिअरशी सलगी सांगायला लागली. वेग आपोआपच कमी झाला. तो यापुढे कायम कमीच राहणार होता. घाटातली अवघड वळणे आणि सुरक्षा हे एकमेव कारण नव्हते. किंबहुना ते खरे कारण नव्हतेच. खरे कारण होते आजुबाजूला पसरलेला, नजर जाईल तिथपर्यंत नजरेला सुखावणारा हिरवागार निसर्ग, ती मनोहर हिरवाई….

इथे वाढला वसंत,
दंवे ओलावली माती सुखकर
थांब ऐकु दे समीरा
गीत हिरवाईचे निवांत क्षणभर
थांब जरा बोल हळु
ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर
बघ निशःब्द रानवेली
अलवार करीती नाजुक कुरकुर

प्रचि २

आमचा पहिलाच थांबा होता एक विस्तीर्ण जलाशय. इथे थोडावेळ थांबून पुढे सरकलो. उशीरा निघालेलो असल्यामुळे कुठेच फारकाळ थांबता येत नव्हते. दुपारी तीनच्या आत कुठल्याही परिस्थितीत मढेघाट गाठायचा होता.

प्रचि ३

प्रचि ४

फारसे कुठे न थांबता, तरीसुद्धा बाईकचा वेग कमी असल्याने निसर्गाची हिरवी जादू अनूभवत हा हा म्हणता केळदच्या परिसरात येवून पोचलो.

ओज कसे वृक्षगर्भी
ओल्या पानांची किंचीत थरथर
झाडांमधुनी नागमोडी
वाट जशी कुणी नार अटकर

प्रचि ५

केळद गावापासून उजव्या बाजूला एक रस्ता जातो तो थेट उपांड्या घाटाकडे. तिथे घाटाच्या सुरुवातीला एका वाहत्या नदीपात्राजवळ बरीचशी मोकळी जागा आहे. गाड्या शक्यतो इथेच पार्क कराव्या लागतात. (थेट मढेघाटापर्यंत गाड्या नेवून तिथल्या वातावरणाला प्रदुषणाची ओळख करून देणारे काही नतद्रष्ट महाभाग सुद्धा असतातच). पण आम्ही गाडी इथेच पार्क केली आणि शेवटचा दिड – दोन किलोमीटरचा पट्टा पायीच निघालो. उपांड्याने अगदी झोकात आमचे स्वागत केले.

प्रचि ६

या रस्त्याने पुढे पायी चालत जाताना सहज आजुबाजूला लक्ष गेले आणि सभोवार पसरलेल्या हिरव्यागार धरित्रीने मन मोहून टाकले.

हे रान हिरवे लाजले
कोवळी जणु नववधु नवथर
इथे ओलावला वसंत
पालवी गाते हिरवाई निरंतर
सभोवार सौंदर्य फाकले
क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर

प्रचि ७

पावसाची रिमझिम सुरू झालेली होती. आम्ही रमत गमत मढेघाटापाशी येवून पोहोचलो.

असे म्हणतात की कोंडाणा घेतला पण त्या लढाईत महाराजांचा सिंह गेला. त्यानंतर त्या नरसिंहाचे, नरवीर तानाजी मालुसरे यांचे शव (मढे) मावळ्यांनी आपल्या खांद्यावर वाहून त्यांच्या गावी उमरठला नेले. तिथे जाताना थकलेल्या त्या वीरांनी काही काळासाठी सुभेदारांचे शव एका ठिकाणी विश्रांतीसाठी म्हणून काही काळ टेकवले होते.  आता त्या जागी कुणा अनाम भक्ताने एक छोटीशी सिमेंटची देवडी / छत्री बांधलेली आहे. (दुर्दैवाने या देवडीचा वापर सद्ध्या काही मक्याची कणसे विकणारी माणसे आपली शेगडी पेटवून मके भाजण्यासाठी करतात)
तोच हा मढेघाट आणि हेच ते पावन स्थळ.

प्रचि ८

इथून निसर्गाच्या जादुला सुरूवात होते. जसजसे जवळ-जवळ जावू लागलो तसतसे उंचावरून कोसळणार्‍या जलप्रपाताचा रौद्रगंभीर नाद कानावर पडायला सुरुवात झाली होती. थोडे जवळ जावून पाहीले, पण त्याने फारसा काही अंदाज येइना. धबधबा आहे हे निश्चित झाले होते, पण त्याच्या व्याप्तीचा, आकारमानाचा काहीच अंदाज येत नव्हता.

प्रचि ९

पुढे थोडेसे वाकून पाहण्याचा प्रयत्न केला परंतू समोरची हिरवीगार दरी आणि तिच्यातून वाहणार्‍या त्या पाण्याचा बारीकसा प्रवाह सोडला तर काहीच दिसत नव्हते.

“शिट यार, इथुन तर काहीच दिसत नाहीये  ! ” ओंकार आणि मी ही थोडे वैतागलोच.
प्रचि १०

प्रचि ११

“इथून काही  दिसणारच नाही, तिकडे, त्या बाजूला जा. तिथून धबधबा अगदी स्पष्ट दिसतो.”
समोरच्या बाजुला उभ्या असलेल्या एका बेलाग कड्याकडे बोट दाखवीत शेजारीच उभ्या असलेल्या एक काकू म्हणाल्या आणि आम्ही त्या कड्याकडे जाण्याचा रस्ता, पाऊलवाट शोधायला लागलो.

प्रचि १२

रस्ता शोधत त्या कड्यावर जावून पोहोचलो खरे, पण समोर जे अदभूत उभं होतं ते पाहून आपण इथे धबधब्याचे दर्शन घ्यायला आलो आहोत हेच मुळात विसरून गेलो. खाली खोल हिरव्यागार दरीत वाहत असलेल्या कुठल्याश्या त्या चिमुकल्या नदीने  जणुकाही त्या तिथे एका चंद्रकोरीचे रुप धारण केलेले होते.

प्रचि १३

प्रचि १४

पाऊस कधी रिमझिम तर कधी जोरात कोसळत होताच, पण इथे समोरची दरी धुक्याने भरलेली, की भारलेली (?) होती. त्या धुक्यातुन दिसणारे निसर्गदेवतेच्या मंदीराचे  ते हिरवेगार कळस वेड लावत होते.

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

तेवढ्यात आधी ओंकारलाच भान आले आणि तो जवळ-जवळ ओरडलाच…

“विशू, इकडे बघ….”
मी वळून बघीतले आणि… ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ अशी काहीशी मनाची अवस्था झाली. तो देखणा, रांगडा निसर्गपुरुष खळाळत खालच्या दरीच्या दिशेने झेपावत होता. ‘देता किती घेशील दो कराने’ अशी अवस्था झालेली होती मनाची.अनिमिष नेत्रांनी ते सुख उपभोगणे  एवढेच त्या क्षणी मनाने ठरवले होते.

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

आणि तेवढ्यात पावसाने झड धरली. इतक्या वेळ रिमझिमत एखाद्या शांत सतारीसारखा कोसळणारा तो पाऊस, अचानक एखाद्या तबलानवाझाने शांतपणे केरवा वाजवता, वाजवता अचानक त्रितालात शिरावे तसा बेभानपणे कोसळायला लागला. पाचेक मिनीटेच पडला असेल पण सगळीकडे वातावरण गारेगार करून गेला. अशा वेळी वंदनाताईंच्या ओळी आठवल्या नसत्या तरच नवल.

काळ्याकाळ्या मेघांमधुनी
शुभ्र कशा या धारा झरती
अवतीभवती झुलू लागल्या जलधारांच्या माळा

पाऊस कमी झाला, पण त्याची जागा आता धुक्याने घ्यायला सुरूवात केली होती. माझा हा भाच्चा कम मित्र मायबोलीचा मुक वाचक आहे. अर्थात तो माबोवर येतो ते आपल्या जिप्सीची म्हणजे योगेशची प्रकाशचित्रे बघायला. जिप्स्याच्या कुठल्यातरी अशाच एका धाग्यावर बघीतलेल्या सप्तरंगी छत्रीने ओंकारच्या मनात फार पूर्वीच घर केलेले होते, साहजिकच आज त्याने इथे जिप्सीची  स्टाईल मारायचा मोह आवरण्याचा मुर्खपणा केला नाही.

प्रचि २२

तो छत्रीचे फोटो काढत असताना मी जरा स्थिरावलो होतो, तिथल्याच एका शिळेवर स्वस्थ बसलो होतो. त्यावेळी ओंकारने घेतलेला अस्मादिकांचा हा एक फोटो. (प्रचि २२ आणि २३ आणि २६ हे ओंकारने टिपलेले आहेत , खाली माझ्या नावाचा वॉटरमार्क असला तरी)

प्रचि २३

आता धुक्याचं साम्राज्य पसरायला सुरूवात झालेली होती. धुक्याची दाट चादर हळुहळु आसमंतात पसरायला लागली होती.

प्रचि २४

धुक्याचा असर काय होता हे लक्षात व्हावे म्हणून हे दोन फोटो पाहा. प्रचि २५ (आधी) आणि प्रचि २६ धुक्याच्या चादरीतला फोटो, छायाचित्रे वेगवेगळ्या दिशेने घेतलेली असली तरी दोन्ही चित्रातले झाड एकच आहे,

प्रचि २५

प्रचि २६

येताना स्वच्छ, तांबुस रंगाचा असलेला हा रस्ता, पाऊलवाट आता नुकत्याच बरसून गेलेल्या वरुणराजाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवत छान सुस्तावून पडली होती. त्या चिखलातून वाट काढत आम्ही पुन्हा एकदा बाईककडे परतलो आणि बाईक घेवून परतीच्या प्रवासाला लागलो

प्रचि २७
ओंकार पंचवाघ, ज्याच्यामुळे ही देखणी सहल घडली. धन्यवाद ओंकार !

प्रचि २८

पुन्हा तोच हिरव्यागार वनराईतून, भाताच्या खाचरातून जाणारा रस्ता, तेच मनमोहक वातावरण…

प्रचि २९

केळद घाट उतरल्यावर उजवीकडे दिसणारा हा अनामिक पर्वतराज जणू काही “पुन्हा या रे बाळांनो” असे म्हणत निरोपच देत होता.

प्रचि ३०

येताना पुन्हा एकदा सकाळी लागलेल्या जलाशयापाशी थांबलो. आता भास्करराव सुद्धा परतीच्या  प्रवासाला लागले होते. त्यांचे दर्शन काही झाले नाही. पण कातरवेळेच्या त्या संध्याछाया त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होत्या.

प्रचि ३१

त्या मावळत्या सुर्यनारायणाला मनोमन नमस्कार करून, पुढच्या पावसाळ्यात मढेघाटाला पुन्हा एकदा आणि शक्य झाले तर  मुक्कामी भेट द्यायची असा निश्चय करून आम्ही घराकडे परत निघालो.

विशाल…

Advertisements