करवंदं, उंबरं… मोदक आणि अर्थातच कोकण !

आपण खरंच नशीबवान आहोत. रोजच्या रामरगाड्याचा कंटाळा आलाय, थोडा बदल हवाय असे वाटले की फारशी धावपळ करावी लागत नाही. ‘रजा मिळत नाही’यासारखी कारणे बायकोच्या तोंडावर फेकून तिचे वाकडे झालेले तोंड बघावे लागत नाही. कंटाळा आलाय तर दोन कपडे बॅगेत भरा आणि निघा….

सज्जनगड आहे, कोयनाडॅमचा परिसर आहे अगदीच एक-दोन दिवस हातात असतील आणि हाताशी स्वतःचे वाहन असेल तर मग कोकणही फार दूर नाही. गेल्या महिन्यात असेच झाले. बायकोला कधी नव्हे ते शनीवारची सुटी मिळाली तिच्या शाळेतून आणि रवीवार जोडून घेवून आम्ही दिवे आगारला कुच केले. सकाळी लवकरच घर सोडले. ताम्हिणीच्या रस्त्याला लागताना आजुबाजुचे कोरडे वातावरण बघून थोडा मुडऑफच झाला होता. पण जरा आत शिरल्यावर हळुहळू हिरवाई दिसायला सुरुवात झाली. त्यात एका ठिकाणी करवंदाची जाळी दिसली म्हणून थांबलो आणि मग हरवलेला मुड परतायला वेळ लागला नाही.

प्रचि १
1

प्रचि २
2

खरेतर दिवेआगारला ज्यांच्याकडे उतरणार होतो त्या केळकरकाकुंना आधी फोन करून जेवायच्या वेळेपर्यंत पोचतो असे सांगितले होते. पण ताम्हिणी घाटातला हा रानमेवा पाहून काकुंना परत फोन केला आणि आता काय जेवायच्या वेळेपर्यंत पोहोचू असे वाटत नाही असे सांगुन टाकले. पण काकुंनी , “काळजी करु नका, तुम्ही चार वाजता पोहोचलात तरी गरम गरम जेवायला वाढेन” असे सांगितले आणि आम्ही निश्चिंत झालो.

प्रचि ३
कच्ची-पक्की करवंदे
3

प्रचि ४
हि फळे भलतीच टेम्प्टींग वाटत होती, पण नक्की काय आहे ते माहीत नसल्याने तोंडात टाकायचा धीर झाला नाही.
4

प्रचि ५
उंबर
5

प्रचि ६
6

प्रचि ७
7

प्रचि ८
8

आजुबाजुला फिरताना हे दोस्तही सापडले …
प्रचि ९
9

प्रचि १०
10

प्रचि ११
11

शेवटी अकरा-साडे अकराच्या दरम्यान नाईलाजानेच तिथून बाहेर पडलो आणि माणगावच्या दिशेने कुच केले. यानंतर मात्र अध्येमध्ये कुठेच थांबलो नाही. करवंदं, उंबरं खाऊन पोटही बर्‍यापैकी भरलेलं असल्यामुळे आता जेवायला मुक्काम पोस्ट दिवे आगार गाठायचे असेच ठरवले होते. त्यानुसार दोन वाजेपर्यंत दिवेआगारला पोचलो.

केळकरांचे हे केळकर भोजन आणि निवासगृह काही फार उत्कृष्ट वगैरे कॅटेगरीतले नाहीये. खरेतर ते साधेच आहे अगदी. पण त्यामुळेच तिथे घरचा फिल येतो. महत्वाचे म्हणजे कोकणच्या गाभ्यात राहात असुनही, स्वतः अस्सल कोब्रा असुनही केळकर कुटुंबिय कोब्रांना लाज आणतात. चक्क अतिशय प्रेमाने, मायेन विचारपूस करतात. स्वतःचेच गाडे पुढे न रेटता तुमचे म्हणणे ऐकुन घेतात. आणि महत्वाचे म्हणजे ‘हे असलं काही आमच्याकडे मिळत नाही’ असे वस्सकन अंगावर न येता ‘ते’ कुठे मिळू शकेल हे प्रेमाने सांगतात. ( हे आणि ते म्हणजे मांसाहारी अन्न).”

केळकरांकडे त्यांच्या घराव्यतिरीक्त सहा-सात जादा खोल्या आहेत त्या ते पर्यटकांसाठी भाड्याने देतात. प्रत्येक खोलीत दोन कॉट, गाद्या, पंखे यासारखे जुजबी सामान असते. एसीची चैन इथे नाही. पण तरीही लोक केळकरांकडे यायला धडपडतात. त्याचे कारण म्हणजे काकुंकडे मिळणारे उकडीचे मोदक. ते तसे कोकणात सगळीकडेच मिळतात हो, पण आंब्यांच्या दिवसात काकुंकडे खास हापुसचे शाही मोदक असतात आणि अप्रतिम चवीचं शुद्ध शाकाहारी जेवण ….

प्रचि १२
12

प्रचि १३
केळकर निवास
13

बरं खोलीत गरम होतय म्हणून तुमच्यावर कोणी खोलीतच बसून राहा म्हणून सक्ती नाही केलेली काही. केळकरांची छान दोन एकराची वाडी आहे. कुठेही जावून पथारी पसरा. दिवे आगारला गेले की समुद्रावर फिरणे तर होतेच. पण माझा मुख्य प्रोग्राम असतो, काकुंकडून एक चटई घ्यायची आणि वाडीत जावून तोंड वर करून पडायचे. एखादे पुस्तक आणि जोडीला कधी तलत, तर कधी वसंतराव, कधी आशाबाई तर कधी अख्तरीबेगम असतातच.
सुख म्हणजे तरी दुसरे काय असते हो?

प्रचि १४
14

प्रचि १५
15

केळकरांकडे पोचलो आणि गरमागरम जेवूनच घेतले आधी. माफ करा मोदकांचे फोटो काढायला वेळ नाही मिळाला. (खरेतर बायकोने मोबाईल आणि कॅमेरा दोन्ही काढून घेतला होता. आता आधी गपचूप, व्यवस्थीत जेव असा दम भरुन) तसेही समोरचे गरमागरम खास हापुसचे शाही मोदक पाहिल्यावर फोटो काढण्याचे भान आणि वेळही कुणाला होता म्हणा.

केळकरांच्या वाडीत अजुनही बरंच काही आहे बरंका…

प्रचि १६
फणस…
16

प्रचि १७
17

प्रचि १८
18

प्रचि १९
19

प्रचि २०
20

प्रचि २१
21

प्रचि २२
22

प्रचि २३
23

प्रचि २४
24

प्रचि २५
25

त्या दिवशीही संध्याकाळी समुद्रकिनार्‍यावर एक चक्कर झालीच. दिवे आगारच्या समुद्रकिनार्‍याची मात्र वाट लागलेली आहे आता. तिथे वॉटरस्पोर्ट्स सुरु झाल्यापासून सगळ्या किनार्‍यावर ती वाहने दिवसभर इकडून-तिकडे फिरत असतात. निवांतपणे समुद्रकिनार्‍यावर बसून सागराची गाज ऐकण्याचं सुख आता दिवे आगारमध्ये उपभोगता येत नाही. त्यासाठी मग तुम्हाला रात्री साडे सात-आठच्या नंतर बीचवर जावं लागतं. त्यावेळी लोकांची गर्दीही विरळ झालेली असते. त्यामुळे वॉटरस्पोर्ट्सवाल्यांचा धिंगाणाही कमी झालेला असतो.

तरीही एखादा चुकार रेंगाळत असतोच शेवटची गिर्‍हाइके शोधत…
प्रचि २५
25

आम्ही सहा-साडे सहाच्या सुमारास गेलो होतो बीचवर. भास्कररावांना बाय-बाय केल्याशिवाय निघायचे नाही असे ठरवले होते. गर्दी कमी व्हायला लागली होती.

प्रचि २६
26

प्रचि २७
27

प्रचि २८
28

शेवटी भास्करराव अगदीच दिसेनासे झाल्यावर आम्हीही बीचचा निरोप घेवून परत केळकरांच्या घराकडे निघालो. मोदक वाट बघत होते. सकाळी लवकर उठून एक चक्कर समुद्रकिनार्‍यावर टाकायची, सुर्यनारायणाचे दर्शन घ्यायचे आणि मग साडे आठ-नऊच्या दरम्यान न्याहारी करून हरिहरेश्वराकडे प्रयाण करायचे. असा बेत होता. त्यानुसार सकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान समुद्रकिनार्‍यावर येवून हजर झालो.

समुद्रकिनार्‍यावर तसा उजेड होता बर्‍यापैकी, पण अजून सुर्यनारायणाचे आगमन झालेले नव्हते. आमच्यासारखेच सकाळची शुद्ध हवा खायला आलेले काही रसिक लोक दिसत होते. काहींचा व्यायाम सुरू होता, तर काही जण नुसतेच या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत होते. इतक्यात पुर्वा उजळायला लागली..

प्रचि २९
29

पूर्वा उजळली तसे आसमंतही झळाळून निघाले..
प्रचि ३०
30

प्रचि ३१
31

प्रचि ३२
32

आणि तेवढ्यात सुर्यनारायणाने हजेरी लावलीच.

प्रचि ३३
33

प्रचि ३४
34

आता काकुंच्या हातचे गरमागरम पोहे-उप्पीट जे असेल ते हाणायचे आणि हरिहरेश्वरला रवाना….

जाते-जाते एक सेल्फी हो जाये?

35

हरिहरेश्वरबद्दल पुन्हा कधीतरी… !

विशाल.