ऋतु हिरवा …

 

चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे…. (बालकवि)

पावसाळा संपत आलाय, वर्षाराणीला आता परतीचे वेध लागलेत. पण तिच्या इथल्या अल्पकालीन वास्तव्याने सुद्धा हि धरा नितांतसुंदर अशा हिरवाईने नटवून, सजवून टाकलीय. एखादी नवविवाहिता लग्नानंतर प्रथमच माहेरी यावी आणि तिच्या येण्याने माहेरची सारी रयाच उजळून जावी तसं काहीसं झालंय. अर्थात हे नेहमीचंच आहे पण तरीही प्रत्येक वेळी नवंनवंसं, हवंहवंसं वाटणारं आहे. विशेषतः मी राहतो ते नेरेगाव ; जुन्या माथेरान रोडवर पनवेलपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेलं हे छोटंसं, आता शहरी होत चाललेलं एक खेडं. एका बाजूला हळू हळू जवळ येत चाललेले पनवेलचे शहरीकरणाचे पाश स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत इतर तिन्ही बाजूंनी व्यापलेला हिरवागार निसर्ग आणि डोंगरदऱ्या जपण्याचा प्रयत्न करणारं नेरे गाव.

नेरेगावातून एक रस्ता मागच्या बाजूने सह्याद्रीचे बोट पकडून आंबिवली, लोणीवली, शेडुंग, पाली असे करत कुठल्यातरी एका ठिकाणी एक्सप्रेस वेला स्पर्शत कोकणात शिरतो. तर एक रस्ता गाढेश्वरी नदीशी गप्पा मारत-मारत वाजे, वाजापूर , धोदाणी करत थेट माथेरानच्या पायथ्याशी जावून पोचतो. एक गोष्ट पक्की कि पनवेल सोडून इतर कुठल्याही दिशेने जा , जिथवर नजर जाईल तिथवर सर्वत्र हिरवाई पसरलेली दिसून येतेय.

20160825_120611

निसर्गाच्या नाना कळा, नाना रंग , विविध रूपे. निसर्ग जेव्हा आपल्याच लहरीत, स्वतःच्याच तालावर डोलायला लागतो ना, तेव्हा त्याच्या लीला , त्याची रूपे पाहण्यासारखी असतात. त्यातही त्याचा मुड आनंदी असेल तर मग सगळे विश्वच सुंदर होऊन जाते. मग अगदी एखाद्या शुष्क, पर्णहीन वृक्षाला सुद्धा एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. पावसाळा म्हणजे अशीच पर्वणी असते..! शांताबाई (शेळके) म्हणतात…

पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले
जळ

भरून आलेलं आभाळ, बहरून आलेली धरा ! प्रियेच्या आवेगाने धरित्रीकडे झेपावणाऱ्या वर्षेच्या धारा ! सगळंच कसं मोहून टाकणारं, वेड लावणारं. जणू काही कालिदासाच्या मेघदूतामध्ये वर्णिलेले त्या कामार्त यक्षराजाचे ते विरहवेडे दुतच ! यक्षाचा निरोप घेऊन त्याच्या प्रियेकडे (कि धरेकडे?) निघालेले ते मेघदूत !

निळे सावळे घन थरथरणारे
दंव्-बिंदूचे अन हळवे स्पंदन
विहग स्वरांचे सुखे मिरवती
शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा…

आणि मिलनाच्या त्या आतुर, अधीर ओढीने अलगद स्रवणारी ती वसुधा, तिच्या जणूकाही स्तनसम पर्वतातून झरणारे ते निर्झर कुठल्याश्या अनामिक ओढीने , अज्ञात दिशेने, आवेगाने धावत सुटतात. आणि जिथून जिथून जातील तिथली धरा आपलं रूप पालटायला लागते, नटायला लागते. हिरवाईचा विलक्षण, संमोहक साज लेवून सज्ज होते. अगदी नजर पोचेल तिथपर्यंत हिरवेगार मखमली गालिचे अंथरलेले. केवळ जमीनच नाही, तर झाडे, वेली एवढेच नव्हे तर एखाद्या एकाकी, ओसाड, घराची एखादी जीर्ण पडकी भिंतसुद्धा हिरवीगार होऊन गेलेली असते या दिवसात. एखाद्या शुष्क वृक्षाला सुद्धा बांडगुळाच्या रुपात का होईना पण हिरवाई चिकटतेच. अगदी जातिवंत कुरुपतेलासुद्धा सौंदर्य मिळवून देणारी अशी ही या ऋतूची किमया….

20160825_120711

बाकीबाब त्यांच्या एका कवितेत फार छान लिहून गेलेत याबद्दल…

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखांसवे होऊनी अनावर

आणि अशा या स्वर्गीय वातावरणात जेव्हा अचानक पावसाची रिमझिम संततधार भेटावी…

अहाहा, यासारखे दुसरे सुख नाही. पावसाची साथ कुणाला नको असते? पण माणसाला हे क्षण जपून ठेवावेसे वाटतात. नभातून कोसळणारा पाऊस, चोहोबाजुला पसरलेली हिरवाई आणि “थांब, मी या पावसाला कैदच करून टाकते!” म्हणणारी चिंब प्रिया…, ती हिरवळलेली वसुधा ! स्वर्ग-स्वर्ग तो अजून काय असतो?

मेघांचे उत्सव रिमझिमणारे
जलदांचे अन सुरेल चिंतन
समीर बावरा निरंतर गातो
आषाढातील जलदाच्या वेणा…

खरेतर मला भटकायला आवडतं आणि पावसात खास करून धबधबे, नद्या बघत बसण्यापेक्षा त्या पावसाने ओलेचिंब झालेले रस्ते न्याहाळणं, त्या रस्त्यावरून फार नाही, पण तरीही अगदी फार फार ८०-९० च्या वेगाने बाईक चालवणं हे खास आवडतं. पाऊस जर फार मोठा नसेल ना तर त्या पावसाची एक वेगळीच गंमत असते. मातीला एक जीवघेणा , वेड लावणारा गंध सुटलेला असतो. वाईट अवस्था होते. गाडी चालवू? क्लच-अ‍ॅक्सेलरेटरकडे लक्ष देवु? की हेल्मेटच्या काचेवरून ओघळणारे पाणी टिपत बसू…..
कि सगळे सोडून गाडी एका बाजूला उभी करून मुग्ध करून सोडणाऱ्या त्या मृदगंधाच्य आहारी जावू? काही कळेनासे होते.

पण समोर दूरवर जाणारा , हिरव्यागार वनराईत लपलेला रस्ता दिसत राहतो आणि मग भान विसरून फक्त अ‍ॅक्सेलरेटर कमी जास्त करत पुढे जात राहणं इतकंच आपल्या हातात उरतं. इथुन तिथून चिंब भिजलेला रस्ता, रस्त्याच्या कडेने पावसाची जल मौक्तिके अंगा-खांद्यावर मिरवत उभी असलेली हिरवीगार झाडे आपलं लक्ष वेधून घ्यायला लागतात. कुठेतरी माझ्याही नकळत मी ही त्या हिरवेपणात हरवत हिरवा व्हायला लागतो. मग काळ वेळ विसरायला होतं. सकाळ, दुपार , संध्याकाळ असे भेद विसरून जायला होतं. बालकवींच्या कवितेत अनुभवलेली ती ‘आनंदी’ अवस्था असते.

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे
…………………………..आनंदी आनंद गडे !

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातल्या सगळ्या विवंचना विसरून निसर्गापुढे, त्याच्या महानतेपुढे नतमस्तक होण्याचा तो क्षण असतो. स्वतःचे अस्तित्व , काही काळापुरते का होईना पण विसरून त्या वनदेवतेला शरण जाण्याचा तो क्षण असतो. अशा वेळी मग मीही स्वतःला भौतिकाच्या, व्यावहारीकतेच्या चौकटीच्या बाहेर फेकून देतो आणि …..

गीत अधरीचे ते हूळहूळणारे
थिजलेल्या अन मौनाचे मंथन
मेघही वळले होवून आतूर
अन जलधारांची अक्षयवीणा…

ते मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे
रुजतो अन होवून हिरवे पाते
लंघुन सार्‍या सीमा शब्दांच्या
एकटा कोरतो मौनाच्या लेण्या… !!

विशाल कुलकर्णी
३०/०८/२०१६